पहूर, ता.जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील नाचणखेडा येथे रहिवास असणार्या व कोरोनाशी प्रतिकार करण्यासाठी कार्यरत असणार्या महिलेचा कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपचार सुरू असतांना मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे.
याबाबत वृत्त असे की, जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथे गावातच प्रशासकीय सेवा करणार्या एका ५४ वर्षीय कोरोना योद्धा महिलेचा उपचारादरम्यान जळगाव येथे कोविड रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. तसेच नाचणखेडा येथीलच अन्य एका ३४ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक तथा नोडल अधिकारी डॉ. हर्षल चांदा यांनी दिली आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत असताना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास कोरोना संसर्गाशी लढा देणार्या नाचणखेडा येथील ५४ वर्षीय गावातीलच प्रशासकीय सेवेत असणार्या कोरोना योद्धा महिलेचा जळगाव येथे कोवीड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर यापूर्वी ऍन्जिओग्राफीची शस्त्रक्रिया झाली असल्याचे समजते. प्रशासनाच्या वतीने त्यांच्यावर जळगाव येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तर नाचणखेड्यातील एका ३४ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने रहिवास असलेला भाग प्रतिबंधित केला असून तेथे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.