जळगाव, प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय/दंत महाविद्यालयातील अध्यापकीय पदाबरोबर रुग्णसेवेशी संबंधित गट क व गट ड सरळसेवा कोटयातील १०० टक्के भरण्याबाबत मान्यता देऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ आज राज्य सरकारी गट ड (चतुर्थ श्रेणी)मध्यवर्ती महासंघाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने करण्यात आली.
राज्य सरकारी गट ड (चतुर्थ श्रेणी)मध्यवर्ती महासंघातर्फे विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी राज्यातील रुग्णालयांमध्ये ठेकेदारी पद्धतीने अथवा बाह्य यंत्रणेद्वारे वर्ग ४ ची भरती करू नये. गट ड (चतुर्थ श्रेणीची ) सर्व रिक्तपदे सरळसेवेने त्वरित भरावी अशी मागणी करण्यात आली. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिनस्त असलेल्या सर्व रुग्णालयांमधील चतुर्थ श्रेणीच्या एकूण रिक्त जागांवर तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असलेल्या ९२२ बदली कर्मचाऱयांना शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे. वर्षानुवर्षे कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना शासनसेवेत कायम करावे व यापुढे कंत्राटी पद्धतीची भरती बंद करावी. तसेच महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिनस्त रुग्णालय व कार्यालयातील अनुकंपा व वारसा हक्काची प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढावीत. पदोन्नती पात्र असलेल्या वर्ग ४ कर्मचाऱ्यांना ज्येष्ठतेनुसार वर्ग ३ मध्ये त्वरित पदोन्नती द्यावी. तसेच ८ जुलै २०१९ रोजी झालेल्या देशव्यापी संपांचे फक्त बदली कापण्यात आलेले वेतन त्यांना परत द्यावे व कोविड कक्षात कर्तव्य वाजविणाऱ्या वर्ग ४ कर्मचाऱ्यांची निवास्थाने छोटी असल्याने त्यांच्या विलगीकरणासाठी इतरत्र सुरक्षित ठिकाणी त्यांना हलविण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना पाठविण्यात आले. या मागण्यांची त्वरित पूर्तता न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनांवर पवन सैंदाणे , मंगेश बोरसे आदींच्या स्वाक्षरी आहे.