नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशावर आलेल्या संकटासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार जबाबदार आहे. त्यांची चुकीची धोरणं आणि भोंगळ कारभार सीमांवरील समस्यांचे मूळ असल्याची टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे.
आज काँग्रेस कार्यकारिणी समितीची एक बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. राहुल गांधींसह काँग्रेसचे अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते. यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या की, देश आज आर्थिक संकट आणि महामारीचा सामना करत आहे. यादरम्यान भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीमुळे देशात तणाव आहे. या दोन्ही संकटांसाठी एनडीए सरकारचे चुकीचे निर्णय आणि धोरणं कारणीभूत आहेत. सरकार पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवून लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत असल्याचे देखील सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.