Home Cities जळगाव मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीमेचे आयोजन : डॉ. अविनाश ढाकणे

मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीमेचे आयोजन : डॉ. अविनाश ढाकणे


avinash dhakne

जळगाव (प्रतिनिधी) आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी शनिवार 2 व रविवार 3 मार्च, 2019 रोजी जळगाव जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.

 

जिल्ह्यात 1 जानेवारी, 2019 या अर्हता दिनांकावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तथापि, यामध्ये मतदार नोंदणी झाली नाही, अशा वंचित नागरिकांसाठी मतदार नोंदणीची आणखी एक संधी मिळावी म्हणून 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. तथापि, या मोहिमेवेळीही मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करू न शकलेल्या नागरिकांना आणखी संधी देण्यासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी विशेष मोहीम हाती घेण्यात येत आहे.

 

या दिवशी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरिकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारणार आहेत. बीएलओंकडे नमुना क्रमांक 6, 7, 8 व 8अ चे अर्ज उपलब्ध असतील. तसेच नागरिकांना आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी 1 जानेवारी, 2019 या अर्हता दिनांकावर प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम मतदार यादी बीएलओंकडे उपलब्ध असेल.

 

सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी निरक्षर मतदारांसाठी मतदार यादीचे वाचन करण्यात येणार असून गावांमध्ये मतदार यादीचे चावडी वाचनही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिक कल्याण संघटना (रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशन- आरडब्ल्यूए) आणि सर्व ग्रामस्थांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या सूचना देण्याबाबत कळविण्यात आले आहे.

 

या कार्यक्रमाची माहिती सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना देण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्राकरीता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय सहाय्यकाची (बीएलए) नेमणूक करण्याची विनंती करण्यात आली आहे. मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे, अशी विनंतीदेखील राजकीय पक्षांना करण्यात आली आहे.

 

मतदारांच्या सोयीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीwww.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1950 हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करुन देण्यात आला असून नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून मतदार नोंदणीविषयक अधिक माहिती जाणून घ्यावी. असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound