पहूर प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या मांडवा खूर्द गावाच्याजवळ १२ जून रोजी रात्री अज्ञातांनी दुचाकी अडवून एकाला मारहाण करत रोखरक्कम लुटल्याची घटना घडली होती. पहूर पोलीसांनी पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. ईश्वर विनायक जोशी, गजानन विनायक जोशी, अमजद नवाब तडवी, अक्षय हौसू जोशी, प्रवीण धोंडू औटी सर्व रा. वाकोद ता.जामनेर असे संशयित आरोपीची नावे आहेत.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, विजय शांताराम गवळी रा.तोंडापूर ता.जामनेर हे १२ जून रोजी दुचाकीने मांडवे खूर्द गावाजवळून रात्री ८.३० वाजेच्या सुमारास जात असतांना रस्त्यावर दुचाकी अडवून अज्ञात तिघांनी गाडीला धक्का दिला. त्यात विजय गवळी खाली पडले. तिघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली व जवळील ८ हजार ८० रूपये अन मोबाईल असा एकुण १४ हजार रूपये किंमतीचा माल लांबविला होता. विजय गवळी यांच्या फिर्यादीवरून पहून पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधिक्षक गोरे, डीवायएसपी कातकाडे यांना गोपनिय माहिती मिळाल्यावरून सपोनि राकेशसिंह परदेशी यांनी पथक तयार करून जबरी लुटीतील दोघांना वाकडी येथून ताब्यात घेतले आहे. दोघांची चौकशी केली असता त्यांनी जबरी लुट केल्याची कबुली दिली. आरोपी यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन गाड्या व चोरलेला मुद्देमाल गुन्ह्याचे कामी जप्त करण्यात आले आहे. सोबत असलेले इतर तिघांची नावेही सांगितली.
पहूर पोलीस ठाण्याचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, पोलीस हवालदार शशिकांत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर ठाकरे यांनी अथक मेहनत घेऊन सदर गुन्हा उघडकीस आणला आहे. या तपास लागलेल्या जबरी चोरी वरून इतर वाकडी व तोंडपूर परिसरातील इतर गुन्हे देखील उघड होण्यास मदत मिळणार आहे.