विद्यार्थ्यांच्या जिज्ञासा वाढीवर भर द्यावा ; अरविंद जगताप यांचे शिक्षकांना आवाहन

भुसावळ, प्रतिनिधी । मुलांना प्रश्न विचारू द्यावेत, नाहीतर पुढील आयुष्यात प्रश्न न विचारण्याचा न्यूनगंड त्यांच्यात निर्माण होतो. आपण जास्त बोलण्यापेक्षा मुलांचे ऐकण्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. आपल्या कृतीतून व शिकविण्यातून मुलांची जिज्ञासा वाढायला हवी, असे प्रतिपादन दहावी मराठी पाठ्यपुस्तकातील “आप्पांचे पत्र” या पाठाचे लेखक अरविंद जगताप यांनी केले.

जळगाव जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे सुरू असलेल्या ऑनलाईन संवाद सत्राच्या दुसऱ्या टप्प्यातील चौथ्या सत्रात अरविंद जगताप बोलत होते. प्रारंभी बालभारती अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी प्रास्ताविक करून लेखक अरविंद जगताप यांचा परिचय करून दिला. “चला हवा येऊ द्या” या लोकप्रिय मालिकेतील पोस्टमनकाकांच्या पत्रांच्या माध्यमातून त्यांचे लेखन जगभर प्रसिद्ध झाले असून नुकतेच त्यांचे “पत्रास कारण की” हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, पत्रातून कुटुंब कळते. आपला इतिहास पत्राद्वारे कळतो. म्हणून पत्रांना खूप महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपल्याला शिवकालीन पत्रांद्वारे समजतो. नंतरच्या काळात सानेगुरूजी, गांधीजी, अब्राहम लिंकन यांची पत्रे प्रसिद्ध झाली. गोष्ट डोंगराएवढी याचे लेखन करत असताना अब्राहम लिंकन यांचे पत्र समोर होते. नवीन पिढीतील शिक्षकांवर खूप मोठी जबाबदारी आहे. शिक्षणात शेतीचे महत्त्व असून मुलांच्या मनात ते पेरायला हवे. एसीमध्ये बसून काही लोक शेतकऱ्यांना सल्ला देतात, हे चुकीचे आहे. काय लिहायला पाहिजे याचे भान लेखकांनी ठेवले पाहिजे. स्वतः लिहिलेले आवडले म्हणजे आपण थांबतो म्हणून सातत्याने प्रयत्न सुरू ठेवायला हवेत. स्वतः कार्यरत राहिले पाहिजे. वृक्षसंवर्धनाचा सल्ला देताना पांडुरंग झाडामध्ये असल्याने वारीच्या काळात झाडे लावायला हवीत, अशा प्रकारचा संदेश देण्याचे काम सुरू आहे. वडाच्या झाडाची फांदी तोडून आणून त्याला फेऱ्या मारण्यापेक्षा नवऱ्याने लावलेल्या वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्यास ती नवऱ्याची खरी पूजा ठरेल, असे सांगून संतपरंपरा आणि शाळेतील भिंतीपत्रकातून लेखनाची प्रेरणा मिळाली असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. शिक्षक आणि विद्यार्थी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे श्री. जगताप यांनी मनमोकळेपणाने दिली.

Protected Content