यावल प्रतिनिधी । येथील भागवत उर्फ बाळू डिगंबर पाटील व त्यांची पत्नी विमलबाई भागवत पाटील यांचे मृतदेह आज सकाळी यावल-फैजपूर रोडला लागून असणार्या शेतातील विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील महाजन गल्ली परिसरातील रहिवासी भागवत उर्फ बाळू डिगंबर पाटील वय (६१) व त्यांच्या पत्नी विमलबाई भागवत पाटील (वय ५७) यांचे मृतदेह आज सकाळी यावल-फैजपूर रोडवर असणार्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या समोर असणार्या निर्मल नत्थू चोपडा यांच्या विहिरीत आढळून आले. या दोघांचे मृतदेह विहरीत तरंगतांना आढळून आल्याने परिसरातील नागरिकांनी येथे धाव घेतली. भागवत उर्फ बाळू डिगंबर पाटील हे आज सकाळी सहाच्या सुमारास घरून आपल्या पत्नीसह निघाले. रस्त्यात त्यांना काही जणांना विचारणा केली असता आपण फिरण्यासाठी चालल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर विहरीतच त्यांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
भागवत उर्फ बाळू डिगंबर पाटील हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य पुंजो डिगंबर पाटील यांचे लहान बंधू आहेत. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह विहरीतून बाहेर काढण्यात आले आहेत.