जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव येथील पोलीस निरीक्षक व अन्य पोलीस कर्मचारी हे पदाचा गैरवापर करून जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोप करीत मजुरी काम करणाऱ्या भाईसाहेब बाबूलाल पटेल यांच्या सह सुमारे १५ जणांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर साखळी उपोषण सुरु केले आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकार्यांना एक निवेदनही दिले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे.
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पो.नि. चंद्रकांत सरोदे, पो.कॉं. राजेंद्र कोळी, खुशाल पाटील व प्रकाश साळुंखे यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून न्यायालयात खोटे दोषारोप पत्र दाखल करणे, फिर्यादी व साक्षीदारांचे जवाब न घेणे, मला व माझ्या नातलगांना खोट्या गुन्ह्यात अडकवून फरार घोषित करणे, तसेच घटनास्थळाचा पंचनामा न करणे, असले प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.