Home क्राईम धानोरा येथील दोन बालकांची हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप

धानोरा येथील दोन बालकांची हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप


जळगाव प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील धानोरा येथील दोन बालकांना अपहरण करून त्याची हत्या करून विहिरीत फेकून दिल्याप्रकरणी आरोपी शेख खालिद शेख इस्माईल याला जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. राजीव पांडे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपी हा जिल्हा कारागृहात होता. कोरोनामुळे व्हीसीद्वारे ही शिक्षा सुनावण्यात आली.

धानोरा येथील शेख खालिद शेख इस्माईल (वय ३५) याचे शेजारी मेहबूबखान याच्याशी चांगले संबंध होते. त्यामुळे त्यांचे येणे जाणे होते. मात्र तो मेहबूबच्या मुलीशी जास्त बोलत असल्याने हे मेहबूबच्या पत्नीला आवडत नव्हते. हटकल्यामुळे शेख खालीदला राग आला होता. १० जानेवारी २०१९ रोजी मेहबूबखान बाजारात गेला असताना त्यांच्या पत्नीने कळवले की मुलगी निजबा उर्फ मिजबा (वय पाच वर्षे) व तन्वीर खान (वय सहा वर्षे) हे बेपत्ता आहेत. त्यानंतर ते दोघे मुलांना शोधायला निघाले. तेव्हा शेख खालीदने दोन्ही मुलांना विहिरीत फेकले होते. याबाबत मेहबूबखानने फिर्याद दिली. अडावद पोलीस स्टेशनला अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी शेख खालीद यास अटक करण्यात आली होती.

आरोपी शेख खालिद शेख इस्माईलने चिमुकलीवर अत्याचार करून विहिरीत फेकल्याचे समजले. हा खटला अमळनेर येथील सत्र न्यायालयात सुरू होता. न्यायालयाने १० साक्षीदार तपासले. त्यात प्रत्यक्षदर्शी चेतन महाजन, अकबर शेख यांची साक्ष ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या.राजीव पांडे यांनी आरोपीस भादंवि कलम ३०२ प्रमाणे जन्मठेप व पाच हजार दंड, दंड न भरल्यास एक वर्ष शिक्षा तर कलम ३६३ अपहरण प्रकरणी पाच वर्षे शिक्षा, तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने शिक्षा तर पुरावा नष्ट केला म्हणून कलम २०१ प्रमाणे तीन वर्षे शिक्ष व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.


Protected Content

Play sound