धरणगाव, प्रतिनिधी । विवरे येथील धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनराज रामकृष्ण माळी यांचे चिरंजीव व विवरे येथील पोलिस पाटील मेघराज माळी यांचे पुतणे चि. मोनेश याचा विवाह धानोरे येथील चिंतामण रंजू रोकडे यांची मुलगी चि. सौ. का. प्रथमी हिच्याशी आज गुरुवार रोजी विवरे या ठिकाणी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला.
माळी परिवारातील या विवाहासाठी संपूर्ण धानोरे गावात सॅनिटायझरचा फवारा मारून सॅनिटायझेशन करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करत, ५० नातेवाईक आप्तेष्टांसमोर पार पाडण्यात आला. याप्रसंगी वरपिता धनराज माळी यांनी सामाजिक बांधिलकी ठेवत व महात्मा फुले यांच्या विचारांना आदर्श मानत देशात व राज्यात बर्याचशा लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे व काही लोक मृत्यूमुखी पडत आहेत. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेवून त्यांनी राज्याचे व देशाचे संकट हे माझे परिवारावरील संकट आहे ही भावना जागृत होऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११००० रूपयाचा धनादेश विवाह प्रसंगी धरणगाव तालुका शासकीय समन्वय समितीचे अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी एरंडोल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, युवा नेते विशाल देवकर, धरणगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रविंद्र भिलाजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, धानोरा येथील सरपंच भगवान आसाराम महाजन, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, मार्केट कमिटीचे सभापती रविंद्र महाजन, युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार, धरणगाव शहर अध्यक्ष संभाजी कंखरे उपस्थित होते. गुलाबराव वाघ व इतर प्रमुख अतिथिंनी मुख्यमंत्री सहायता निधीस ११००० रुपयाची मदत केल्याबद्दल धनराज माळी यांचे आभार मानले.