जळगाव प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसीतील कंपनीतून घरी जात असतांना समोरून येणार्या भरधाव ट्रकने जोरदार धडक देवून दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना सुप्रिम कॉलनीजवळ आज सायंकाळी घडली. दरम्यान, संबंधीत ट्रकचालकास अटक करण्यात आली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, दौलत उत्तम शेरे (वय-४०) रा. सुप्रिम कॉलनी हे जळगावातील एमआयडीसीत हमालीचे काम करतात. आज सायंकाळी कामावरून दुचाकी क्रमांक (एमएच २१ एफ १६७६) ने आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरी जात असतांना जळगाव औरंगाबाद महामार्गावरील सुप्रिम कॉलनीच्या रिक्षा थांब्याजवळ समोरून येणारा ट्रक (एमएच ०४ एफडी २०१३) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दौलत शेरे हे रोडवर पडले. त्यावेळी भरधाव वेगाने जाणारा ट्रकने त्याचा चिरडले त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयत दौलत यांचा मृतदेह सिव्हील रूग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला आहे. दरम्यान, घटना घडताच एमआयडीसी पोलीसांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. मयताची पत्नीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा घटनेतील ट्रक जप्त करण्यात आला आहे. मयताच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा आहे.
अपघात झाल्यानंतर ट्रक चालक ट्रक सोडून पळून गेला होता चालकाबाबत पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना माहिती मिळाल्यावर चालक मुस्ताक अहमद अब्दुल नबी (रा.चोपडा हल्ली मुक्काम सुप्रीम कॉलनी जळगाव यास ट्रांसपोर्ट नगर जळगाव येथून अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस ठाणे अंमलदार संतोष सोनवणे यांच्यासह पोउनि विशाल वाठोरे, स.फौ.अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, महेंद्रसिंग पाटील, विजय नेरकर, जितेंद्र राजपूत, स्वप्नील पाटील, चालक भूषण सोनार, माजी सैनिक रवींद्र बाविस्कर यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत हा सुप्रीम कॉलनी परिसरातील राहणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता.