जळगाव प्रतिनिधी । अल्पवयीन मुलीला पळविल्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला पोलिस कोठडीचा हक्क राखून न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. दरम्यानच्या काळात ओळखपरेड झाल्यानंतर आज शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गणेश सखाराम बांगर (३२, रा.मालेगाव, जि.वाशिम) असे संशयित आरोपीचे नाव आहे. गेल्या आठवड्यात नशिराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अकोलाकडे पायी जाणाऱ्या कुटुंबातील १३ वर्षीय मुलीली दुचाकीवर बसवून पळवून नेले होते. या मुलीला लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ट्रक चालकाकडे सोपवून तो फरार झाला होता. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. २६ मे रोजी पोलिसांना चकवा देणार्या गणेश बांगरला नाशिकला अटक करण्यात आली होती. गुन्ह्यात त्याच्या विरुध्द बाललैंगिक अत्याचाराचे (पोस्को)वाढीव कलम लावण्यात आले.यानंतर २७ मे रोजी भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तपासाधिकारी गजानन राठोड यांनी बांगर याला न्यायालयात हजर केले असता जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे यांनी त्याची पोलीस कोठडीचा हक्क राखून कारागृहात रवानगी केली.
दरम्यानच्या संशयित गणेश बांगर याची पोलिसांनी अोळखपरेड केली. यात संबंधित अल्पवयीन मुलीने बांगर यास अोळखले आहे. यानंतर बांगर यास शुक्रवारी न्या. आर.एन.हिवसे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्या.हिवसे यांनी बांगर यास ९ जुनपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी काम पाहिले.