जळगाव प्रतिनिधी । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केल्यानुसार आज सकाळी नऊपासून राज्यातील बाजारपेठा काही नियमांच्या अधीन राहून सुरू झाल्या आहेत. या अनुषंगाने शहरातील दुकाने उघडणार असून यात शासकीय नियमांचे पालन होते का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ५ जूनपासून राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता बाजारपेठा उघडणार असल्याचे सूतोवाच केले होते. यानंतर राज्य सरकारने याबाबतचे दिशानिर्देश जारी केले होते. यानुसार आज सकाळी नऊ वाजेपासून दुकाने सुरू झाली आहेत. व्यापारी संकुलांमधील दुकानांना मात्र परवानगी नाही. यामुळे जळगाव शहरातील गोलाणी मार्केट, महात्मा फुले मार्केट आदींसह अन्य संकुलांमधील व्यावसायिकांना दुकाने उघडण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.
दुकानांसाठी सम-विषम हा नियम लागू करण्यात आला आहे. याच्या अंतर्गत एका तारखेला रस्त्याच्या एका बाजूला तर दुसर्या दिवशी दुसर्या बाजूची दुकाने सुरू राहणार आहेत. दुकानदारांनी फिजीकल डिस्टन्सींगचे नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहेत. कालच महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी याबाबतचे निर्देश जारी केले असून याचे आज पालन होणार की नाही ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.