गुड न्यूज: मान्सूनची केरळ किनारपट्टीवर धडक

मुंबई वृत्तसंस्था । भारतात मान्सूनचे आगमन झाले असून केरळ किनारपट्टीवर धडक दिली आहे. भारतीय हवामान खात्याचे संचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली आहे. भारतात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात ७५ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याआधी हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेटने ३० मे रोजी मान्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर केले होते.

दरम्यान मुंबईत आज सकाळी पावसाने हजेरी लावल्याचे पहायला मिळाली आहे. दुसरीकडे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे रविवारी रात्री राज्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत जाणार असल्याने कोकणासह राज्याच्या बहुतांश भागाला पुढील चार दिवस पूर्वमोसमी वादळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाने याआधी १ जूनला संपूर्ण राज्यात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली होती. तसेच २ जूनला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. ३ आणि ४ जूनला उत्तर कोकणामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत कोकणात इतर ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. विदर्भामध्येही विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार प्रामुख्याने कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पुढील तीन ते चार दिवस वादळी पाऊस होईल. पालघर जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतही पावसाचा अंदाज आहे. पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, नगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, परभणी आदी जिल्ह्यांतही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Protected Content