वरणगाव येथे लॉकडाऊनकाळाचा सदुपयोग करत विद्यार्थ्याने बनविले वॉटर कुलर

 

वरणगाव, प्रातिनिधी | येथील मोठा माळी वाड्यातील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्याने टाकाऊ वस्तुंपासून ‘वॉटर कुलर’ बनविले आहे. वीज खंडीत झाल्यानंतर किमान दोन तास हे वॉटर कुलर चालू शकते. यामुळे सहज कुठेही हे कुलर तुम्ही घेऊन जाऊ शकता. टाकाऊ वस्तूपासून बनविल्याने या विद्यार्थ्याच्या कल्पकतेला दाद मिळत आहे.

कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरात बसून कॅरम, सापसीडी, बुद्धिबळ असे नानाविध बौद्धिक क्षमता वाढविणारे खेळ खेळत आहे. अशातच वरणगाव येथील मोठा माळी वाडा येथील इयत्ता सातवीचा विद्यार्थी यश संतोष माळी याने टाकाऊ वस्तूपासून वॉटर कुलर बनविले आहे.

असे बनविले वॉटर कुलर

एका मोठ्या प्लास्टिक बरणीच्या झाकणाला खिळ्याने छिद्रे पाडून घेतले. वरच्या भागाला मोठे होल करून मध्यभागी ‘डीसी’ मोटार लावली. त्यानंतर प्लास्टिक बरणीला मध्यभागी कापून एका दुसऱ्या पाणी पिण्याच्या बाटलीचा वरचा अर्धा भाग कापून तो बरणीला लावला. झाकणाच्या वरती लावलेल्या ‘डीसी’ मोटारला वायरी लाऊन प्लगसोबत बटनाला वायरी चिटकविल्या. मोटारला बरणीमध्ये मध्यभागी एक पंखा लावला. नंतर बॅटरीला प्लग लाऊन बटन दाबायचे. बरणीमध्ये बर्फाचे तुकडे टाकायचे मग तुम्हाला एकदम गारेगार थंडी हवा लागेल.

या टाकाऊ वस्तूचा केला उपयोग

एक प्लास्टिकची मोठी बरणी, डीसी मोटार, बॅटरी, प्लग, बटन, पंखा आणि पाण्याची प्लास्टिक बाटली अशा वस्तुंपासून हे वॉटर कुलर यश माळी या विद्यार्थ्याने बनविले आहे. वीज खंडीत झाल्यावर बरणीत बर्फाचे तुकडे टाकल्यावर बटन सुरु केल्यानंतर गारेगार थंडी हवा मिळेल. साधारण दोन अडीच तास हे वॉटर कुलर हवा देऊ शकते. यश याने लॉकडाऊनच्या सुटीमध्ये असा नाविन्यपूर्ण बौद्धिक क्षमतेला चालना देणारा टाकाऊ वस्तुंपासून वॉटर कुलर बनविले. यशला वॉटर कुलर बनविणेसाठी त्याचा मित्र स्वप्नील भरत माळी याची मदत मिळाली.

Protected Content