यावल प्रतिनिधी । यावल शहरासह तालुक्यातील कोरपावली, दहिगाव व मोहराळे येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या पथकाने नमुने घेतल्यानंतर क्वॉरंटाईनमध्ये असणार्यांशी संवाद साधला.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील कोरोना बाधीत रूग्ण मिळुन आल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोटोळे यांची यावल व तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह गावातील कोरपावली, दहिगाव व मोहराळे येथे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजे आयसीएमआरचे पथक पुणे येथून आले होते. या पथकाने मोहराळे येथे सारी सर्वेक्षण करून नमुने घेतले. तसेच त्यांनी मोहराळे येथील विलगीकरण कक्षात असलेल्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांच्यासोबत तालुका आरोग्य अधिकारी यावल डॉ. हेमंत बर्हाटे, प्रा.आ. केंद्र सावखेडासिमचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती रवींद्र पाटील हे उपस्थित होते.
दरम्यान, कोरपावली व दहिगाव येथे डॉ. दिलीप पोटोळे यांनी कोरोना संदर्भात आढावा घेऊन व समस्या जाणून घेऊन उपस्थित आशा सेविका, आरोग्य कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील व ग्रामसेवक यांना कोरोना (कोविड १९) बाबत उपाय योजना व वैयक्तिक व गावातील नागरिकांनी कशी काळजी घ्यावी याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी आरोग्य विभागातील एल. जी. तडवी, राजेंद्र बारी, कल्पेश पाटील, अनिता नेहते जुगरा तडवी , शोभा जावळे, माया संदानशिव व शिवप्रताप घारू आदी उपस्थित होते. याप्रसंगी सारी कन्सल्टंट सलिल पाटील यांनीही सारी सर्वेक्षणासाठी मोहराळे येथे भेट दिली.