जळगाव, प्रतिनिधी । शहरातील रेमंड कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना एप्रिल महिन्याचा पगार देण्यात यावा, अशी मागणी कंत्राटी कामगारांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्याकडे केली आहे.
रेमंड कंपनीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ठेकेदारी पद्धतीत अनेक कामगार काम करीत आहेत. कंपनी व्यवस्थापनाकडू ठेकेदारामार्फत आजवर कामगारांना नियमीत पगार देण्यात आलेला आहे. देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटाची आम्हाला जाणीव आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन केलेले आहे. लॉकडाऊन काळात कंपनी बंद असल्याने आम्ही देखील घरीच आहोत. कंपनी व्यवस्थापनाने माणुसकी जपत आम्हाला मार्च महिन्याचा पगार ठेकेदारामार्फत दिला आहे. आम्ही सर्व कामगारांची घरची परिस्थिती जेमतेम असून महिन्याला पगार मिळाला तर पुढील महिन्याचा आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असतो. एप्रिल महिन्यात देखील कंपनी लॉकडाऊनमुळे बंद असल्याने आम्ही सर्व कामगार घरीच होतो. लॉकडाऊन असल्याने बाहेर पडणे शक्य नसल्याने इतरत्र कुठे कामही आम्हाला मिळणे शक्य नव्हते. एप्रिल महिना पूर्ण संपला असून मे महिना अर्धा लोटत आला आहे. अद्याप आम्हाला एप्रिल महिन्याचा पगार मिळालेला नसून तो मिळणार नसल्याची माहिती ठेकेदारांच्या प्रतिनिधीकडून समजली आहे. रेमंड कंपनीच्या बाहेर जिल्ह्यात असलेल्या काही ठिकाणी ठेकेदारीत काम करणाऱ्या कामगारांना पगार देण्यात आला आहे. त्याच धर्तीवर आम्हाला एप्रिल महिन्याचा किमान अर्धा पगार देण्यात यावा, अशी विनंती करणारे निवेदन रेमंडच्या कंत्राटी कामगारांनी दिले आहे.
पालकमंत्र्यांनी घेतली दखल
रेमंड कंपनीतील कंत्राटी कामगारांनी अजिंठा विश्रामगृह येथे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. ना.पाटील यांनी लागलीच कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करून कामगारांना शक्य असलेली मदत करण्याच्या सूचना केल्या. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी देखील निवेदन कामगार कल्याण अधिकाऱ्यांकडे पाठविणार असल्याचे सांगितले.