जळगाव प्रतिनिधी । शेअर मार्केटमधून जास्त पैसे मिळवून देतो असे आमिष दाखवून तरूणाला २ लाख ३५ हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शाम आत्माराम सटाले रा. साई पार्क, अयोध्या नगर हा चेन्नईच्या एका फार्म कंपनीत एरीया मॅनेजर म्हणून जळगाव जिल्ह्यात मार्केटींगचे कामे करतो. दरम्यान त्याचे शेअर मार्केटमध्ये शेअर ट्रेडींगचे काम आपस्टॉक कंपनीचे डिमॅट खात्याच्या माध्यमातून करत होते. त्यानंतर फे सबुकवर शेअर मार्केटसंबंधी माहिती सर्च करीत असताना १४ डिसेंबर २०१९ रोजी त्यांना दिलीप मिश्रा नामक व्यक्तीचा फोन आला व त्याने फ्रिडम ग्लोबल रिसर्च नावाची कंपनी असल्याचे सांगून शेअर मार्केटमध्ये चांगला नफा कमवून देऊ शकतो, त्यासाठी १८ हजार तीन महिन्यांची फी भरावी, असे त्याने सांगितले. त्यानुसार कंपनीचे मालक संदीप भारद्वाज यांच्या अकाउंटवर आधी ६ हजार नंतर १२ हजार असे एकूण १८ हजार रूपये सटाले यांनी पाठविले. मात्र, पैसे भरले असून त्याची रिसीटची मागणी केली असता सटाळे यांना मिश्रा याच्याकडून उडावाउडवीची उत्तरे मिळाली. पुन्हा मिश्रा याने १४ लाख रूपये कमवून देतो सांगत त्यासाठी २ लाख ४०० हजार रूपये भरावे लागली असे सांगितले. सटाले यांनी एवढी रक्कम नाही सांगताच तुम्ही हप्त्याने पैसे भरावे असे सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी १२ हजार ०७३ रूपये आधी भरले. नंतर मल्होत्रा नामक व्यक्तीने लवकर पैसे भरण्याचे सांगितल्यानंतर २३ जानेवारी रोजी १ लाख ४० हजार रूपये रक्कम सटाळे यांनी संदीप भारद्वाज यांच्या खात्यावर पाठविली. दरम्यान, १४ लाख रूपये रक्कमेवर ३० टक्के टॅक्स बसेल सांगून पुन्हा पैशांची मागणी केली. अन् ३ हजार २०० रूपये सटाले यांनी पाठविले काही दिवसांनी पुन्हा फाईल पूर्ण करण्यासाठी दहा हजार रूपयांची मागणी झाल्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचा संशय शाम सटाले यांना बळावला. एमआयडीसी पोलीसात संशयित आरोपी फ्रिडम ग्लोबल कंपनीचे मालक संदीप भारद्वाज, दिलीप मित्रा व मल्होत्रा (पुर्ण नाव माहित नाही) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.