कोरोनाचे रूग्ण सुरक्षितच…प्रथमोपचार विभागात पाणी शिरल्याने रूग्णांना सुरक्षितस्थळी हलविले ; गोदावरी रुग्णालयाचा खुलासा

 

जळगाव (प्रतिनिधी) शहरासह परिसरात शनिवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पावसाचे पाणी हे अचानकपणे गोदावरी रूग्णालयाच्या प्रथमोपचार विभागात शिरले. यावेळी रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने रूग्णांना सुरक्षितस्थळी हलविले. दरम्यान कोरोना वॉर्डात कुठलेही पाणी शिरले नसुन कोरोना रूग्ण हे सुरक्षितच असल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाने दिली आहे.

 

शहरासह जिल्ह्यात काल मध्यरात्री २ वाजेपासून मुसळधार पाऊस झाला. या पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसानही झाले. गोदावरी रूग्णालय हे कोरोनासाठी अधिग्रहीत करण्यात आले आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी रूग्णालयाच्या प्रथमोपचार विभागात शिरले. याठिकाणी पाच ते सहा रूग्णांची स्क्रिनींग केली जात होती. पाणी आत शिरल्याने कर्मचार्‍यांनी तातडीने स्क्रिनींगसाठी आलेल्या रूग्णांना सुरक्षितस्थळी हलविले. यासंदर्भात सोशल मीडीयाच्या माध्यमातुन चुकीची माहिती पसरविण्यात आल्याचे रूग्णालय प्रशासनाने कळविले आहे.

 

कोरोना रूग्ण सुरक्षित

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालय कोरोना रूग्णांसाठी अधिग्रहीत करण्यात आले आहे. शासनाच्या नियमानुसार या रूग्णांसाठी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी भरती झालेले रूग्ण हे पुर्णत: सुरक्षित असल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाने दिली आहे. कोरोना विभागात कुठलेही पाणी शिरले नसुन तो विभाग अत्यंत सुरक्षित असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

दिशाभूल करण्याचा प्रयत्न 

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालय कोव्हीड झाल्यापासून याठिकाणी उपचार घेण्यासाठी रूग्ण दाखल होत आहे. शासनाला सहकार्य म्हणून डॉ. पाटील रूग्णालयाने संपुर्ण स्टाफ अत्याधुनिक साधन सामग्रीसह कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध करून दिला आहे. तसेच याठिकाणी तज्ञ डॉक्टरांच्या नियुक्त्या देखिल करण्यात आल्या आहे. सोशल मीडीयाच्या माध्यमातुन डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाविषयी चुकीची माहिती पसरवुन सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रूग्णालयाच्या कोरोना विभागात नव्हे तर प्रथमोपचार विभागात पाणी शिरले होते ही वस्तुस्थिती आहे. तरी नागरिकांनी अफवांना बळी पडु नये. डॉ. उल्हास पाटील रूग्णालय प्रत्येक रूग्णाला सुरक्षित आणि योग्य उपचार देण्यास सज्ज असल्याचे रूग्णालय प्रशासनाने कळविले आहे.

Protected Content