डीन खैरेंच्या भोंगळ कारभार विरोधात आ.चंद्रकांत पाटील यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

 

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील कोवीड – 19 सेंटरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यायाचे अधिष्ठाता यांचा भोंगळ कारभाराबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. भुसावळ येथील कोरोनाग्रस्त रुग्णांबाबत चुकीची भूमिका घेतल्यामुळे संपूर्ण शहर दहशतीखाली आल्याचे आ. पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे.

 

 

आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सद्यस्थितीत जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातलेले असून मुंबईसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वाढत्या रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. त्यातच आपल्यासारखे कर्तबगार मुख्यमंत्री या राज्याला लाभले असून आपण रात्रंदिवस कोरोना या विषाणूच्या संसर्गातून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी जिवाचे रान करीत आहात. मात्र जळगाव जिल्ह्यातील कोवीड – 19 सेंटर असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यायाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांचा भोंगळ कारभार सुरु आहे. दि 30 एप्रिल 2020 रोजी एकूण 52 लोकांचे कोरोना तपासणीसाठी नमुने पाठविल्यानंतर भुसावळ येथील काही रुग्णांना तपासणीचा अहवाल येण्याआधीच डिचार्ज पेपर देऊन त्यांना होमक्वारंटाईन करण्याच्या सुचना केल्या व घरी पाठविले. परंतू त्याच दिवशी रात्रीच्या सुमारास सदरील दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने संपूर्ण भुसावळ शहरात कोरोनाच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले. रात्रीच्या 8 वाजेपासून ते पहाटेच्या 2 वाजेपर्यंत अधिष्ठाता यांच्या भोंगळ व दिरंगाईयुक्त कारभारामुळे या दोन रुग्णांना उपचारा व्यतीरिक्त तात्कळत बसावे लागले. वास्तविक बघता जळगाव येथील कोविड – 19 या सेंटरवर 200 खाटांची व्यवस्था असून फक्त 105 रुग्ण या कक्षात भरती होते. त्यामुळे सदरील रुग्णांना सुध्दा भरती करुन घेणे शक्य होते. परंतू खैरे यांच्या निष्काळजीपणामुळे गोंधळ उडालेला असून हे 2 पॉझिटीव्ह रुग्णांमुळे इतरांना ही बाधा झाल्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यायाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या निष्काळजीपणामुळे सुरु असलेल्या भोंगळ कारभाराची सखोल चौकशी होऊन संबंधितावर योग्य त्या कार्यवाहीचे आदेश व्हावेत, असे म्हटले आहे. दरम्यान, या तक्रारीची प्रत आरोग्यमंत्री राजेशजी टोपे, पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांना सुद्धा पाठविण्यात आल्या आहेत.

 

Protected Content