मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ११ कोटी जनतेचा आशीर्वाद आहे. हे आशीर्वाद म्हणजे तुमच्या रेकण्यातून निर्माण झालेली फेक न्यूज नाही. फेक न्यूजवाल्यांवरील हल्लेही फेकच ठरतात. सरकारला बदनाम करण्यासाठी सुरू झालेले हे फेकतंत्र त्यांच्यावरच उलटेल असे नमूद करत शिवसेनेने आज अर्णब गोस्वीमी यांना फटकारले आहे.
अर्णब गोस्वीमी या ज्येष्ठ पत्रकाराने आपल्या वृत्त वाहिनीवरून पालघर येथील दुर्घटनेवरून केलेले वक्तव्य वादाच्या भोवर्यात सापडले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनात यावर भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, पालघरमधील साधूंची हत्या हा माणुसकीला कलंक आहे. त्याचे राजकारण कोणी करू नये, पण भक्तमंडळी सध्या रिकामटेकडी बसली आहेत व कोरोना युद्धाच्या धुरावर स्वत:च्या भाकऱया शेकवीत आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसारख्या राज्यांत लॉक डाऊनमुळे भूकबळी व त्यातून झुंडबळी सुरू झाले. यावर एखादे चॅनल त्याचे ते डिबेट की काय ते का करत नाही व भक्त मंडळही तोंडाचे लॉक डाऊन करून गप्प का बसले आहेत? इंदूरमध्ये डॉक्टरांना बेदम मारले. बिहारच्या दरभंगामध्ये डॉक्टरांना मारले. कोरोना वायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णाला घेऊन जाण्यास आलेल्या डॉक्टरांच्या टीमवर प्राणघातक हल्ला झाला. ही डहाणूतील साधू हत्येइतकीच झुंडगिरी आहे. महाराष्ट्राकडे वाकडया नजरेने जे पाहात आहेत त्यांचे डोळे बहुधा तिरळे झाले आहेत. त्यांना स्वराज्यातील ही झुंडगिरी दिसत नाही.
अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, डहाणूतील साधूहत्येने महाराष्ट्राच्या इभ्रतीस धक्का पोहोचला हे खरेच, पण ज्या राज्यात गरीब अन्नासाठी बाहेर पडतो, डॉक्टर सेवेसाठी बाहेर पडतो आणि त्यांना मारहाण होते अशावेळी त्या राज्याची इभ्रत वाढते काय? तसे जर कोणाला वाटत असेल तर काय बोलावे? महाराष्ट्रात दोन साधूंची हत्या झाली यावर सोनिया गांधी गप्प का? असा प्रश्न एका सत्संग भक्त चॅनलवरून विचारला जात आहे. हे विचारणे नसून रेकणे आहे. विचारणाऱयास अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते. रेकणाऱयांना ते असू नये कारण ते सुपारी घेऊनच रेकत असतात. असे रेकणे म्हणजे पत्रकारिता या भ्रमातून जनता आता बाहेर पडली आहे. महाराष्ट्रातील साधू हत्येचे मारेकरी फासावर जातील. यासाठी महाराष्ट्राचे पोलीस समर्थ आहेत. इतर राज्यांत भूकबळी व त्यातून जे झुंडबळी जात आहेत त्यावर काय ते बोला! अशावेळी तुमचे घसे बसतात व डोळे तिरळे होतात. ही पत्रकारिता समाजविरोधी आहे. या गंभीर स्थितीतही पत्रकार एखाद्या राजकीय समूहाचे बाहुले बनून स्वत:ची आपटत राहतात, विष पसरवतात व अशा विषारी प्रवाहात भगतगण रंगपंचमी खेळतात. यावर रामबाण उपाय शोधावाच लागेल. महाराष्ट्राचे वातावरण बिघडविणा़र्या टोळधाडी कोणत्याही थराला जातील हे आता स्पष्ट झाले आहे. या टोळधाडींना ज्या कुणाचा आशीर्वाद असेल तो असू द्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ११ कोटी जनतेचा आशीर्वाद आहे. हे आशीर्वाद म्हणजे तुमच्या रेकण्यातून निर्माण झालेली फेक न्यूज नाही. फेक न्यूजवाल्यांवरील हल्लेही फेकच ठरतात. सरकारला बदनाम करण्यासाठी सुरू झालेले हे फेकतंत्र त्यांच्यावरच उलटेल असे यात म्हटले आहे.