मुंबई वृत्तसंस्था । कोरोना विषाणूचे रूग्ण राज्यातसह देशात वाढत चालले आहे. मुंबईतील एकूण ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती वैद्यकीय सुत्रांकडून मिळाली आहे. यात पत्रकार आणि फोटोग्राफर यांचा समावेश आहे.
गेल्या आठवड्यात पत्रकार संघानं मुंबईतील पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या करोना चाचणीसाठी कॅम्प आयोजित केला होता. त्यामध्ये १६८ जणांची करोना चाचणी घेण्यात आली. रविवारी मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार १६८ पैकी ५३ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. करोनाचा संसर्ग झालेले बहुतांश पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियातील असल्याचे समजतेय.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांनी दिलेल्या माहितीनुसार १६८ पत्रकारांची करोनाची चाचणी घेण्यात आली. त्यापैकी ५३ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात येणार आहेत.
दरम्यान, ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर मुंबईतील टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्त किशोरी पेडणेकर यांना सर्व पत्रकारांच्या तपासणीची विनंती केली. याशिवाय पॉझिटिव्ह पत्रकारांच्या क्वारंटाईनची चांगली व्यवस्था व्हावी, अशीदेखील विनंती जगदाळे यांनी महापौरांकडे केली.
जे पॉझिटिव्ह सापडले आहेत त्यांच्या क्वारंटाईनची व्यवस्था झालेली आहे. अजून काही पत्रकार, कॅमेरामन जे ठाणे, वसई, विरार किंवा मीरा रोडला राहतात त्यांना घरीच क्वारंटाईन राहण्याचे सांगण्यात आलं आहे. मात्र, ते शक्य नाही. कारण या पत्रकारांचे घरं लहान आहेत. त्यांच्या परिवारात चार ते पाच सदस्य आहेत. कुणाकडे लहान बाळही आहे. अशावेळी मुंबई महापालिकेनं योग्य पावलं उचलावेत. जे पॉझिटिव्ह सापडले आहेत त्यांची रवानगी योग्य ठिकाणी क्वारंटाईनसाठी ठेवण्याची मागणी केली आहे.