Home Cities जळगाव विद्यापीठात मौलाना आझाद यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरु करण्याची मागणी

विद्यापीठात मौलाना आझाद यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरु करण्याची मागणी


 


जळगाव (प्रतिनिधी) अल्पसंख्यांक समाजाच्या वतीने सिटीझन फोरमतर्फे कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांचे अभ्यास आणि संशोधन (अध्यासन ) केंद्र सुरू करावे, अशी मागणी कुलगुरूंना दिलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, विद्यापीठात महात्मा गौतम बुद्ध अध्यासन, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन, महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन, स्वामी विवेकानंद अध्यासन, महात्मा गांधी अध्यासन, सानेगुरुजी अध्यासन आणि कवियत्री बहिणाबाई चौधरी अध्यासन अशी महापुरुष, संत, विचारक व अभ्यासक यांच्या नावाने एकूण सात अध्यासने आहेत. या अध्यासनांमार्फत त्या महापुरुषांचे कार्य, त्यांनी मांडलेले विचार, त्या विचारांचे समकालीन महत्त्व याबाबत अभ्यास आणि संशोधन केले जाते. तरी विद्यापीठातील इतर महापुरुषांच्या अध्यासनाप्रमाणे मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावाने अभ्यास आणि संशोधन (अध्यासन ) केंद्र सुरू करण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे.

मौलाना अबुल कलाम आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री, प्रकांड पंडित, साहित्यिक आणि आधुनिक विचारवंत, आधुनिक भारतात विज्ञान आणि तंत्र शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे होते. केंद्र सरकारने १९९२ मध्ये मौलाना आझाद यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ किताब प्रदान केला आहे. तसेच त्यांचा जन्मदिवस ११ नोव्हेंबर हा ‘राष्ट्रीय शिक्षण दिवस’ म्हणूनही साजरा केला जातो. विद्यापीठ कार्यक्षेत्र अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मौलनांचे प्रेरणादायी जीवन, विचार, कार्य व मूल्ये यांचा अभ्यास आणि संशोधन करता यावे, यासाठी त्यांच्या नावाने अभ्यास आणि संशोधन (अध्यासन ) केंद्र सुरू करावे, असेही या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर अशफाक पिंजारी, डॉ. अल्तमश हसन, रशीद खान व डॉ. शरीफ बागवान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound