यावल प्रतिनिधी । कोरोना विषाणू सारखा आजाराला हद्दपार करण्यासाठी येथील तहसील कार्यालयात आज सकाळी बैठक झाली. कोरोना विषाणू संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर यावल तालुका कोरोना नियंत्रण समितीची तालुका पातळीवरील आरोग्य विभागचा आढावा तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
कोरोना विषाणूसंसर्ग टाळण्यासाठी घेण्यात आलेल्या नागरिकांच्या आरोग्य संदर्भात नियोजनाचा व कार्यरत असलेल्या आरोग्य यंत्रांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कोरोना या संसर्गजन्य आजाराशी निगडीत विविध प्रश्नांवर सविस्तर माहिती घेण्यात येऊन त्यावर पुढील उपायोजना कशी असावी याबाबत चर्चा करण्यात आली. यावल तालुका कोरोना समितीचे अध्यक्ष तहसीलदार जितेंद्र कुवर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, पं.स गटविकास अधिकारी निलेश पाटील, मुख्याधिकारी बबन तडवी, फैजपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश चव्हाण या बैठकीस हजर होते.
दरम्यान यावल तालुक्याची आरोग्य सेवा ही पूर्णपणे कोलमडली असून आरोग्य विभागाकडे कोरोना आजाराच्या रुग्ण तपासणी संदर्भात कोणतीही यंत्रणा किंवा औषधी आरोग्य विभागाकडे उपलब्ध नसल्याने आरोग्य सेवा ही नावापुरतीच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. असे चित्र दिसत असल्याने राज्यात व जिल्ह्यात कोरोना संचारबंदी लागू झाल्यापासून ग्रामीण भागातील माणस रात्री-अपरात्री इतर शहरात राहणारे किंवा कामानिमित्त बाहेरगावी गेलेले नागरिकांचे आपल्या मूळ गावी येण्यासाठी वाहने भरून येत असल्याचे चर्चा आहे. ग्रामीण पातळीवरील नागरिकांमध्ये या सर्वगोंधळामुळे आपल्या आरोग्याविषयी भितीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने जागृत राहून गांभीर्याने लक्ष देऊन दक्ष राहणे अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.