जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील तळेगाव परीसरात गावठी दारूची विक्री सर्रासपणे होत असल्याने तळीरामांना गावात प्रवेश देऊ नये अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
तळेगाव येथून हातभट्टीच्या दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून सावरला, आमखेडा कासली, टाकरखेडा, ओझरमार्गे जामनेर येथे सुद्धा तळेगाव येथुन हातभट्टीची दारू पोहोचवली जात असल्याची माहीती गावाचे सरपंच व पोलीस पाटील यांना लागली त्यांच्यासोबत काही गावंकरी देखील होते. त्यांनी पाळत ठेवून फुगे घेऊन जाताना आमखेडा येथील एकास रंगेहात पकडले तर दोन व्यक्ती फरार झाले. या संदर्भात पोलीसांना कळविल्यानंतर पोलीसांनी चौकशी केली असता. गावातील प्रकाश वसंत कोळी या व्यक्तीकडून दारू घेतल्याचे लक्षात आले. मात्र तोही घरातून फरार झाला होता. याप्रकरणी पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.
गावातून मोठ्या प्रमाणावर हातभट्टी दारूची तस्करी होत असल्याने थेट जामनेरपर्यंत ही हातभट्टी पोहोचत असल्याची चर्चा सध्या गावात सुरू असून सावरला, आमखेडा, कासली व ओझरमार्गे जामनेर ही मंडळी मोठ्या हातभट्टी दारूचे फुगे घेऊन जात असून कोरोनामुळे गावबंदी असताना देखील ही मंडळी मोठ्या प्रमाणात दारू घेण्यासाठी येत असल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. गावात कोरोना पसरू शकतो असे गावकर्यांचे म्हणणे असून पोलिसांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी देखील होत आहे. दारू विक्रेते हे पोलिसांना माहीत असून नियमित पोलीस स्टेशनला विशिष्ट रक्कम पोहोचवणारे आहेत. त्यामुळे कोणी पकडून द्यावी व कोणी तक्रार करावी अशी परिस्थिती नसताना उलट या काळामध्ये हप्ता वाढ झाल्याची देखील चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे. पहूर पोलिस स्टेशनला सुद्धा आता काही विशिष्ट रकमा जात असल्याचे बोलले जात आहे. कारण त्यांचासुद्धा गाडीचा चक्कर या भागातून होत असल्याने त्यांना सुद्धा काहीतरी द्यावे, असे जामनेर पोलिसांनी सांगितल्यामुळे आता वाटेकरी वाढल्याने भाव वाढले धंदा वाढला, कारण जामनेरपर्यंत व सर्व आजूबाजूचौ खेड्यावर दारू जात असल्याने विक्रेते सुद्धा राजीखुशीने हे आता जास्त रक्कम देत असल्याचे बोलले जात आहे. सध्या परिसरात कोरोना मुळे लोक आणि भयभीत आहेत आशा लोकांना गाव बंदी करून अशा लोकांना गावात प्रवेश देखील देऊ नये अशी मागणी गावकरी करीत आहे.