कोरोना : धोनी पुण्यातील १०० कुटुंबियांना देणार अन्नधान्य

पुणे वृत्तसंस्था । करोना व्हायरस रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार तसेच आरोग्य संघटना युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊनमुळे जे लोक रोजंदारीवर काम करतात त्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत. अशा लोकांच्या मदतीला भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने पुण्यातील रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना मदत केली आहे.

राज्यात १२० हून अधिक करोना रुग्ण आढळले आहेत. मुंबई आणि पुण्यातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. पुण्यात ज्यांचा रोजगार गेला आहे त्यांच्यासाठी धोनीने एका संस्थेला १ लाख रुपयांची मदत केली आहे. अनेक खेळाडू करोना संदर्भात राज्य सरकारांना मदतीचा हात पुढे करत आहेत. पण धोनीने थेट पुण्यातील एका संस्थेला मदत केली आहे. ही संस्था रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांसाठी काम करते.

फक्त धोनीच नाही तर अन्य अनेक लोकांनी या संस्थेला पैसे दिले आहे. यासंदर्भात धोनीची पत्नी साक्षीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. पुण्यातील रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांसाठी तुम्ही कमीत कमी एक हजार रुपये देऊ शकता. यामुळे एका कुटुंबाला १४ दिवसांचे अन्न मिळेल. धोनीने १०० कुटुंबीयांच्या पुढील १४ दिवसांच्या अन्न-धान्याची सोय केली आहे. पुण्यातील या संस्थेने लोकांना साडे १२ लाख रुपयांची मदत देण्याचे आवाहन केले होते. यात सर्वाधिक मदत धोनीने केली आहे. धोनीने दोन वर्ष रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून आयपीएलमध्ये खेळला आहे.

Protected Content