मुंबई वृत्तसंस्था । करोनाचे संकट दिवसागणिक भयावह रूप धारण करत असून देशभरात ७००च्या जवळपास लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. तर, २० जणांचा मृत्यू झाला आहे. कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी हातभार म्हणून शिवसेनेचे सर्व आमदार व खासदार आपला एक महिन्याचा पगार देणार आहेत. हा निधी मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये जमा केला जाणार आहे.
देशात सर्वाधिक बाधित राज्य म्हणून महाराष्ट्राचा क्रमांक आहे. राज्यात आतापर्यंत १३० लोकांना करोनाची बाधा झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यापुढे अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. त्या जशा सामाजिक आहेत, तशा आर्थिकही आहेत. देशातील अनेक मोठ्या उद्योजकांनी आतापर्यंत राज्य सरकारला करोनाशी लढण्यासाठी मदतीचा हात देऊ केला आहे. कुणी रुग्णालयांमध्ये क्वारंटाइन कक्ष उघडण्यासाठी मदत केली आहे तर, कुणी आपल्या मालकीची रिसॉर्ट उपलब्ध करून दिली आहेत. तर काही गावातील रिसॉर्ट यांच्याकडून मदतही करण्यात येत आहे.
राजकीय नेते मंडळीही यात मागे नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच आपला एक महिन्याचा पगार पंतप्रधान मदत निधीमध्ये जमा करण्याची घोषणा केली होती. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही आपल्या खासदार निधीतून १ कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. तर, काँग्रेसचे नेते राहुल गांधी २.६६ कोटी रुपयांचा निधी देऊ केला आहे.