जळगाव प्रतिनिधी । संचारबंदीमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार, साठेबाजी रोखणे, अडचणी सोडवण्यासाठी तसेच समन्वय ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी उपाययोजना केल्या असून यासाठी अधिकार्यांचा स्वतंत्र चमू कार्यरत राहणार आहे.
संचारबंदीच्या काळात जनतेला कोणतीही अडचण होऊ नये म्हणून जिल्ह्यात अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या मदतीसाठी सहायक अधिकारीही असणार आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांसाठी शासनाकडून वेळोवेळी आदेश देण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने समन्वय साधणे, मार्गदर्शन करणे, अहवाल देणे आणि त्याबाबत सर्व कामे पार पाडण्यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा नियमित स्वरूपात पुरवठा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. रेशन दुकान, होलसेल किराणा मालाचे पुरवठादार यांच्याकडून धान्याचा पुरवठा सुरळीपणे होण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी व सहायक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांची नेमणूक करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याची जबाबदारी विशेष भूसंपादन अधिकारी राजेंद्र वाघ यांच्यावर देण्यात आली आहे. चेकपोस्ट नियंत्रण व जीवनावश्यक सेवांच्या वाहतुकीवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्याकडून देखरेख ठेवण्यात येत आहे. तर साठेबाजी व काळाबाजार होणार नाही, याची खबरदारी व कारवाई औषध प्रशासनाचे आयुक्त व्ही.टी. जाधव यांच्याकडून करण्यात येत आहे. मेडिकल स्टोअर्समध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री करण्यात येणार नसल्येही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नियुक्त अधिकार्यांना कोरोना विषाणू व संसर्गाच्या अनुषंगाने सोपवण्यात आलेली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडण्यासाठी इतर कार्यालये, अधिकारी यांना सहकार्य करावे. अधिकार्यांनी त्यांच्या जबाबदारीमध्ये दिरंगाई व कसूर केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला आहे.