महसूल पथकावर हल्ला करणारे अटकेत

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील भरवस गावाजवळ महसूल पथकावर हल्ला करणार्‍या तिघांना अटक करण्यात आली आहे.

भरवस जवळ वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरला ४ रोजी रात्री थांबवणार्‍या पथकातील चार तलाठ्यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी मारवड पोलिसांनी ट्रॅक्टर मालकास अटक केल्यानंतर पुन्हा तिघांना मारवड पोलिसांनी आज अटक केली आहे. यातील ट्रॅक्टर मालक बबलू राजेंद्र तायडे याचे खरे नाव भूषण सुनील माळी असून त्यास कालच रात्री पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून मिळवलेल्या माहितीच्या आधारे ८ रोजी रात्रीचे १० वाजता सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल फुला, हवालदार किशोर पाटील, पोलिस नाईक भास्कर चव्हाण, सुनील अगोने, चालक दिनेश कुळकर्णी यांच्या पथकाने राकेश भगवान वडर (वय २१), गिरीश उर्फ बाळा जयवंतराव पाटील (वय २३) यांना अटक केली. तर त्यांच्या माहितीनुसार ट्रॅक्टरचा चालक मुकेश आनंदा भील (वय १९, सर्व रा. बेटावद, ता. शिंदखेडा) याला रात्री उशीरा अटक केली.

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी बबलू तायडे उर्फ भूषण सुनील माळी यास मारवड पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली होती. त्यास अमळनेर येथे न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती सुषमा अग्रवाल यांनी त्याची तीन दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. तर इतरांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Protected Content