जळगाव (प्रतिनिधी) महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जळगाव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या जाहिर झाल्या आहेत. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम जिल्ह्यातील कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) स्वस्त धान्य दुकानांमध्ये सुरु आहे. आधार प्रमाणीकरणासाठी संबंधित सेंटरला शासनामार्फत शेतकरीनिहाय रक्कम देण्यात येणार असल्याने कोणत्याही शेतकऱ्यास आधार प्रमाणीकरणाकरीता सेंटरला पैसे देण्याची आवश्यकता नाही. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.
शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील 1 लाख 43 हजार 832 शेतकरी पात्र ठरले आहे. या शेतकऱ्यांची गावनिहाय यादी गावातील ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सोसायटी व बँकांच्या बाहेर लावण्यात आल्या आहेत. तसेच या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरणाचे काम संपूर्ण जिल्ह्यात सुरु आहे. अनेक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम पूर्ण झाले आहे तर काही शेतकऱ्यांचे सुरु आहे. तथापि, या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून रक्कम घेण्यात येत असल्याचे वृत्त सोशल मिडीयावर निदर्शनास आले आहे.
या अनुषंगाने जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कळविण्यात येते की, या योजनेच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरण करतांना कुणालाही पैसे देण्याची आवश्यकता नाही. ज्या शेतकऱ्याकडेकोणी पैशांची मागणी करीत असेल अशा शेतकऱ्यांनी ही बाब तातडीने तहसीलदारांच्या निदर्शनास आणून द्यावी. तसेच कोणत्याही कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) अथवा इतर कोणीही शेतकऱ्यांकडून रक्कम घेऊ नये. तसे आढळून आल्यास अशा सेंटरचा परवाना रद्द करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिला आहे.