यवतमाळ (वृत्तसंस्था) घाटंजी येथील तहसीलदारांच्या निवासस्थानासमोर एका तलाठ्याची कार वाळू माफियांनी पेट्रोल टाकून पेटविल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री घडली आहे. दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
घाटंजीच्या तहसीलदार पूजा माटोडे यांनी अवैध रेती तस्करीविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. रात्री-अपरात्री महसूल पथकासह त्या पेट्रोलिंग करीत आहे. बुधवारी रात्री त्या तलाठी पवन बोंडे यांच्यासह इतर तीन ते चार तलाठ्यांना घेऊन अवैध रेती तस्करीची वाहने पकडण्याच्या मोहिमेवर गेल्या होत्या. पथकातील तलाठी पवन बोंडे यांनी आपले चारचाकी वाहन (एम.एच.३२/वाय.०५३९) तहसीलदार माटोडे यांच्या अंबानगरी येथील निवासस्थानासमोर लावले होते. मात्र अचानक रात्री १.१५ वाजताच्या सुमारास काही वाळू माफियांनी बोंडे यांच्या वाहनावर पेट्रोल टाकून ते पेटवून दिले. रेती तस्करांनी सूड घेण्याच्या उद्देशाने वाहन पेटविले असावे, असा अंदाज तलाठी बोंडे यांनी वर्तविला. दरम्यान, वाहन पेटविणारे दोन जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.