नवी दिल्ली । भारतमाता की जय या घोषणेचा एका विशिष्ट वर्गाकडून राजकीय फायद्यासाठी अतिरेकी वापर करण्यात आला असल्याची टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली आहे.
दिल्लीत झालेल्या पुरुषोत्तम अग्रवाल आणि राधाकृष्ण यांच्या हू इज भारतमाता या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात डॉ. मनमोहन सिंग यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, भारत हा लोकशाही स्वीकारलेला देश आहे. या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु होते. आपल्या देशाला जगाने एक मोठी शक्ती मानलं आहे. या देशासाठी पंडित नेहरुंनी दिलेलं योगदान विसरुन चालणार नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशात काही काळ अस्थिरता होती. अशा काळात पंडित नेहरुंनी या देशाचं नेतृत्व केलं. देशाला एक दिशा देण्याचं काम केलं. आधुनिक भारताची मुहूर्तमेढ ही पंडित नेहरुंनी रोवली. भारतातील विद्यापीठं, शैक्षणिक संस्था आणि सांस्कृतिक प्रगती यांचा पाया रचणारे पंडित नेहरुच होते. त्यांचं या देशासाठीचं योगदान कधीही विसरता येणार नाही. असंही मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. तर देशातील काही घटकांनी राजकीय फायद्यासाठी भारताची प्रतिमा ही कट्टर किंवा उग्र कशी करता येईल यावर भर दिला असंही मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. यात भारतमाता की जय या घोषणेचा एका विशिष्ट वर्गाकडून राजकीय फायद्यासाठी अतिरेकी वापर करण्यात आला असल्याची टीका त्यांनी केली.
पुरुषोत्तम अग्रवाल आणि राधाकृष्ण यांच्या हू इज भारतमाता या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. देशातले काही घटक असे आहेत ज्यांना पंडित नेहरुंबाबत अनादर आहे. त्यांना इतिहास ठाऊक नाही. त्यामुळे ते कायमच पंडित नेहरुंची प्रतिमा मलीन करण्याचे काम करतात. त्यांच्या मनात नेहरुंबाबत जो पूर्वग्रह आहे तेच सत्य आहे असं ते मानून चालतात. अशीही टीका मनमोहन सिंग यांनी केली.