अहमदनगर (वृत्तसंस्था) कोणाविरोधात पुरावे असतील तर त्याचे समर्थन आम्ही करत नाही. परंतू पुरोगामी व्यासपीठ असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करणे, चौकशी करणे चुकीचे आहे. हा दलित, आंबेडकरवादी विचारांना नक्षलवादी ठरवण्याचा डाव असून, एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय काळजी वाढवणारा आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
पुण्यातील एल्गार परिषद चौकशीच्या मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसची साथ मिळाली आहे. या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) देण्याचा केंद्राचा निर्णय काळजी वाढवणारा आहे. दलित व आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा हा डाव तर नाही ना,’ अशी भीती महसूलमंत्री व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. एल्गार परिषद प्रकरणाच्या तपासात पोलिसांची भूमिका योग्य नव्हती. त्यामुळं हे प्रकरण एसआयटीकडे देण्यात यावे, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला पत्र लिहून केली होती. त्यावर काही निर्णय होण्याआधीच केंद्र सरकारनं यात हस्तक्षेप करून हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले होते. हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यास राज्य सरकारने सत्र न्यायालयात विरोध दर्शवला होता.