गिरीश महाजनांच्या सफाईनंतर महाआघाडीतर्फे गोमूत्र शिंपडून ‘शुध्दीकरण !’

ncp shuddhikaran

जामनेर प्रतिनिधी । माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी येथील उपजिल्हा रूग्णालयाची सफाई केल्यानंतर महाआघाडीच्या पदाधिकार्‍यांनी या भागाचे गोमूत्र शिंपडून ‘शुध्दीकरण’ केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

याबाबत वृत्त असे की, जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयातील एका शिबिरादरम्यान आमदार गिरीश महाजन यांना अस्वच्छता दिसली. यानंतर त्यांनी या परिसरात साफसफाई करवून घेतली. या पार्श्‍वभूमिवर, महाआघाडीच्या पदाधिकार्‍यांनी गोमूत्र शिंपडून उपजिल्हा रुग्णालयाचे शुद्धीकरण केले.

गेली साडेचार वर्षे मंत्री असलेल्या महाजन यांना तालुक्यातील समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. आता मंत्रीपद गेल्याने ते देखावा करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी केला. कधी काळी आ. गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक असणार्‍या प्रफुल्ल लोढा यांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, गिरीश महाजन हे गेल्या २५ ते ३० वर्षांपासून सत्तेत असूनही ते रूग्णालयातील सेवांबाबत गांभीर्य नव्हते. आता मंत्रीपद गेल्याने ते स्टंट करत असल्याची टीकादेखील त्यांनी केली. दरम्यान, या प्रकारामुळे जामनेरचे राजकीय वातावरण तापण्याचे संकेत दिसून येत आहेत.

Protected Content