जळगाव प्रतिनिधी । असोदाजवळील रेल्वेब्रीजच्या ठेकेदाराकडे कामाला असलेल्या तरूणाचा रेल्वे रूळ क्रॉस करत असताना धावत्या रेल्वेखाली मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री अकरा वाजेपूर्वी घडली.
सुरेद्रसिंग रामसजिवनसिंग गौड (३०) मुळ रा. मऊ ता. न्योहारी जि. सहडोळ (म.प्र.) याचा मृत्यू झाला. सुधाकर पेन्शनया यांनी आसोदा रेल्वेगेटजवळ ब्रीज उभारणीच्या कामाचा ठेका घेतला आहे. सुरेंद्रसिंग गौंड हा तरूण गेल्या अडीच महिन्यापासून याठिकाणी ठेकेदाराकडे कामाला होता. सोमवारी सायंकाळी बाजार करण्यासाठी तो जळगावला आला होता. बाजार आटोपून तो कामाच्या ठिकाणी निघाला असता आसोदा रेल्वेगेटच्या पुढे खांबा क्रमांक४२२/१७/१९ जवळ रूळ क्रॉस करत असता डाऊन रेल्वे लाईनवर धावत्या रेल्वेचा फटका लागून जागेवरच बेशुध्दावस्थेत पडला. प्रकार लक्षात आल्यानंतर ठेकेदार सुधाकर पेन्शनय्या यांनी ही माहिती सुपर वायझर विक्रम भसमे यांना दिली. स्टेशन उपप्रबंधकांनी खबर दिल्यानंतर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तरूणाला जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. तपासणीअंती डॉक्टरांनी तरूणाला मृत घोषत केले. विक्रम भसमे यांनी घटना कळविल्यानंतर आज मयताच्या नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. तरूणाचा मृत्यू झाल्याचे कळाल्यानंतर नातेवाईकांना धक्का बसला. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास अरूण सोनार हे करीत आहेत.