जळगाव,प्रतिनिधी | मागील चार वर्षापासून महाराष्ट्रातील भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व १५ विद्यापीठांवर राज्यपाल नियुक्त अशासकीय नियुक्त्या करून ठेवल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने संघ विचारधारेचे लोक सर्व पदांवर नियुक्त केले गेले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी अशा अशासकीय नियुक्त्या रद्द केल्याने एनएसयुआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी त्यांचे जाहीर आभार व अभिनंदन प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
एनएसयुआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, भाजप सरकारने विद्यापीठातील अशासकीय नियुक्त्या करतांना सर्व संघ विचारधारेच्या लोकांनी विद्यापीठाला वेठीस धरून विद्यापीठांमध्ये मनमानी करत कुलगुरू सारख्या उच्च विभूषित व्यक्तीला देखील केवळ सह्याजीराव ठेवत दडपशाहीचे वातावरण निर्माण केले आहे. विद्यार्थी हिताला बाजूला ठेवत व विद्यार्थ्यांच्या समस्या न सोडवता केवळ संघ विचारधारा विद्यापीठांमध्ये रुजवण्याचे काम या व्यक्तींनी सुरू ठेवले आहे. जळगाव विद्यापीठांमध्ये देखील त्याच प्रकारे संघ विचारधारेचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन सदस्य दिलीप रामू पाटील यांची नियुक्ती केली गेली. राज्यपालांना व्यवस्थापन सदस्य नेमणुकीचा अधिकार आहे. परंतु, विद्यापीठ कायद्यानुसार सदर व्यक्ती एखाद्या क्षेत्रामध्ये म्हणजेच क्रीडा, शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक, कला, सहकार आदी मध्ये निपून व तज्ञ असला पाहिजे. दिलीप रामू पाटील वरीलपैकी एकाही क्षेत्रांमध्ये निपून वा तज्ञ नाहीत. मग त्यांची नियुक्ती कशाच्या आधारावर केली गेली ? दिलीप रामू पाटील केवळ संघाचे प्रचारक आहेत, याच उद्देशाने त्यांची व्यवस्थापन सदस्यपदी नियुक्ती केली गेली असावी विद्यापीठ हे शिक्षणाचे माहेरघर आहे. येथे विद्यार्थी घडविला जातो. परंतु, आज विद्यापीठांमध्ये विद्यार्थी घडवणे नाही तर संघ प्रचारक घडवण्याचे काम हे लोक करीत आहे. परंतु, जिल्हा एनएसयुआयतर्फे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी पाठपुरावा करून महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या सर्व प्रकरणाची दखल घेत प्रथम विद्यापीठ यावरील अशासकीय नियुक्त्या रद्द केले आहेत त्याबद्दल त्यांचे जळगाव जिल्हा एनएसयुआयतर्फे जाहीर आभार व अभिनंदन तसेच आमदार उदय सामंत यांच्याशी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या झालेल्या चर्चेमध्ये लवकरच विद्यापीठांमधील संघ विचारधारेच्या लोकांच्या नियुक्त्या रद्द होतील व विद्यापीठ संघ मुक्त होऊन विद्यार्थी विकासाकडे झेप घेईल. तोपर्यंत जळगाव जिल्हा एनएसयूआय असाच लढा देत राहील असे म्हटले आहे.