नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोणतीही पूर्वसूचना न देता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा केंद्र सरकारने तडकाफडकी हटविली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निर्णयावर आक्षेप नोंदवण्यात आला असून संताप व्यक्त करण्यात आला आहे. केंद्र सरकारने जाणुनबुजून शरद पवारांची सुरक्षा कमी केल्याचा आरोप राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. सुरक्षा काढली म्हणून शरद पवार घराबाहेर पडणार नाहीत का ? असा सवालही त्यांनी विचारला आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सुरक्षा पुरवली जाते. संबंधित व्यक्तीला असलेल्या धोक्याची तीव्रता लक्षात घेऊन याबाबत निर्णय घेतला जातो. वेळोवेळी सुरक्षेचा आढावा घेतला जातो. सुरक्षेत कपात करायची असल्यास संबंधित व्यक्तीला त्याची पूर्वकल्पना दिली जाते. मात्र, शरद पवारांच्या बाबतीत असं काहीही झालेले नाही. याआधी केंद्र सरकारकडून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची एसपीजी सुरक्षा हटवण्यात आल्यानंतर वाद निर्माण झाला होता.