विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी पतीसह चार आरोपींची निर्दोष मुक्तता

2jalgaon court 310x165

जळगाव, प्रतिनिधी | चाळीसगाव तालुक्यातील करगांव, येथील सपना सागर राठोड या विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी पतीसह चार आरोपींची निर्दोष मुक्तता जळगाव सेशन्स कोर्टाने केली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सपना सागर राठोड हीचे लग्न सागर उत्तम राठोड याचे सोबत दि.३१ मे २०१५ रोजी झाले होते. तिच्या लग्नात तिला तिचे माहेरून १० ग्रॅम सोने व संसारोपयोगी सामान देउन चांगल्या प्रकारे मानपानासह लग्न लावुन दिले होते. लग्नानंतर तिला सासरच्यांनी एक वर्ष चांगले वागविले. त्यानंतर, तिचा पैशांसाठी सासरच्याकडून त्रास द्यायला सुरुवात झाली. मी दुसरीशी लग्न केले असते, तर एक लाख रुपये हुंडा मिळाला असता, असे तिचा नवरा सागर उत्तम राठोड हा तिला म्हणत असे आणि जेठ तुळशीराम उत्तम राठोड, दुसरा जेठ मदन उत्तम राठोड व जेठाणी शकुंतला मदन राठोड हे तिला टोचुन बोलत असत. पती सागर व सासरकडील मंडळी  तिला मारहाण करत असतं. या सर्व गोष्टी  सपना माहेरच्या मंडळींना सांगत असे व ते तिला म्हणत असतं की, तु आता गरोदर आहेस, एखादं मुलबाळ झाल्यावर सर्व काही ठीक होईल, असे सांगुन तिला समजावून तिला परत सासरी नांदायला पाठवत असत. सन २०१६ मध्ये सपनाला मुलगा झाला, त्यानंतरही तिचा छळ व गांजपाट कमी झाला नाही. घटनेपुर्वी तिन महिन्यांपुर्वी सासरच्या लोकांनी तिला ईलेक्ट्रिक शॉक दिला होता. दि.२० जानेवारी २०१७ रोजी सकाळी सपनाने तिची आई अनिताबाईला फोन करून सांगितले की, आता मला सासरच्यांचा त्रास सहन होत नाही, हे मला मारुन टाकतील, नाहीतर मी माझ्या जिवाचे काहीतरी बरेवाईट करून घेईल. त्यानंतर त्याच दिवशी रात्री ११:४० वाजता पती सागर याने तिच्या माहेरी फोनवरून कळविले की, सपना ही घरातुन पळुन गेली आहे व आम्ही तिचा शोध घेत आहोत. त्यानंतर सपनाचे आई-वडिल व ईतर नातेवाईक दुसऱ्या दिवशी दि.२१जानेवारी २०१७ रोजी लगेच करगांव येथे आरोपींच्या घरी आले व तेथे मुक्कामी राहिले. दि.२२ जानेवारी २०१७ रोजी सपनाचे प्रेत करगांव-चाळीसगाव रोडवरील गणपती मंदिरासमोरील विहिरीत आढळले.  त्यानंतर सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यावर दि.२५ जानेवारी २०१७ रोजी मयत सपनाचे वडील प्रेमसींग मानसिंग पवार रा. उपलखेडा, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद यांनी वरील चारही आरोपींविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. त्यावरुन पोलीसांनी आरोपी सागर उत्तम राठोड व तुळशीराम उत्तम राठोड यांना अटक केली. आरोपी मदन उत्तम राठोड व त्याची पत्नी शकुंतला मदन राठोड यांना जळगाव सेशन्स कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. सदर खटल्याचे चौकशीकामी जळगाव सेशन्स कोर्टात सरकारपक्षातर्फे मयत सपनाचे वडील फिर्यादी प्रेमसिंग मानसिंग पवार, आई अनिताबाई प्रेमसिंग पवार, काका हिरासिंग धनराज पवार, तपासी अंमलदार पोलिस उपनिरीक्षक विजय बोत्रे यांचेसह ईतर अन्य साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या जबानीतील तफावती, अविश्वासार्हता, तसेच तपासकामातील तृटी आदी बाबींचा विचार होउन जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर एन हिवसे यांनी सर्व चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. चारही आरोपींतर्फे बचावाचे काम अॅड. वसंत आर. ढाके यांनी पाहिले. त्यांना अॅड. प्रसाद व्ही. ढाके, अॅड. उदय एस. खैरनार, अॅड. भारती व्ही. ढाके व अॅड. शाम बी. जाधव यांनी सहकार्य केले.

Protected Content