जळगाव, प्रतिनिधी । प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये कुष्ठरोग व क्षयरोग निर्मूलनविषयी सर्व उपस्थितांनी कुष्ठरोग व क्षयरोग पीडीत व्यक्तीबरोबर कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. सामाजिक भेदभाव होणार नाही यासाठी मी कटिबद्ध राहून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे कुष्ठरोग मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील. अशी प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री प्रगती योजनेतंर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमामध्ये स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान-2020 निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटोळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जयवंत मोरे, महानगरपालिकेचे क्षयरोग अधिकारी डॉ. रावलाणी, अशा समन्वयक जगताप, आरोग्य विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, किशोर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिनिधी आदि उपस्थित होते.
या अभियानात जिल्हा आरोग्य विभाग, जळगावतंर्गत 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी, 2020 पर्यंत कुष्ठरोग व क्षयरोग निवारण पंधरवाडा संपूर्ण जिल्ह्यात साजरा करण्यात येत आहे. हा कार्यक्रम राबविण्याविषयी आरोग्य विभागाने केलेल्या नियोजनाची माहिती डॉ. इरफान तडवी, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा कुष्ठरोग विभाग, जळगाव यांनी बैठकीत सविस्तररित्या दिली. या पंधरवाडयात कुष्ठरोग व क्षयरोग विषयी ग्राम पातळी व शहरी भागात जनजागृती करुन समाजातील लपुन राहिलेले कुष्ठरोगी व क्षयरोगी लवकरात लवकर विकृती विना शोधुन त्वरीत औषोधोपचार खाली आणणे, नवीन संसर्गात कुष्ठ व क्षय रोगी शोधुन त्यांना औषोधोपचाराखाली आणुन संसर्गाची साखळी खंडीत करणे, कुष्ठरोग व क्षयरोग दुरीकरनाचे ध्येय साध्य करणे. याबाबत प्रयत्न करण्यात येणार आहे.
या उपक्रमातंर्गत 30 जानेवारी या महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने कुष्ठरोग निवारण दिन साजरा करणे. बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी कुष्ठरोग व क्षयरोग या आजाराविषयी जिल्ह्यातील सद्य:स्थितीतील माहिती जाणून घेतली व मौलिक सुचना केल्यात. या पंधरवाड्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात जास्तीत जास्त ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याकरिता अशा वर्कर यांचा सहभाग घ्यावा. 12 फेब्रुवारी, 2020 रोजी सर्व आशावर्कर यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील शाळेत जाऊन कुष्ठरोग व क्षयरोग या आजाराविषयीची लक्षणे व उपचार याबाबत पोस्टर वाटुन समाजात जनजागृती करण्याबाबात सुचनाही दिल्यात.