नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भाजपाच्या नेत्यांकडून अनेकदा भाषणामध्ये ‘तुकडे तुकडे गँग’चा देशात विभाजन घडवण्याचा डाव आहे अशी टीका केली जाते. परंतू केंद्रीय गृहमंत्रालयाकडे देशातील ‘तुकडे तुकडे गँग’बद्दल कोणतीही माहिती नसल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते संकेत गोखले यांच्या माहिती अधिकार अर्जाला उत्तर देताना केंद्र सरकारने म्हटले आहे की, केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तुकडे तुकडे गँगबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तर तुकडे तुकडे गँग अस्तित्वात नाही. ती केवळ अमित शाह यांच्या संकल्पनेत आहे,” असे ट्विट गोखले यांनी केले आहे. दुसरीकडे अमित शाह हे राजकीय भाषणांमध्ये ‘तुकडे तुकडे गँग’चा उल्लेख करतात यासंदर्भात निवडणुक आयोगाने दखल घ्यावी यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे गोखले सांगतात. सभा आणि भाषणांमध्ये केंद्रीय गृहमंत्री हे शब्द का वापरतात? हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे किंवा लोकांसमोर खोटे बोलल्याबद्दल आणि त्यांची दिशाभूल केल्याबद्दल माफी मागायला हवी,” असे गोखलेंनी म्हटले आहे.