जळगाव,प्रतिनिधी | एक विद्यार्थी एक झाड ही संकल्पना राबवणे गरजेचे असे प्रतिपादन डॉ. एस.टी. इंगळे यांनी केले. ते के. सी.ई.सोसायटीच्या मू.जे. महाविद्यालय भूशास्त्र प्रशाळा आयोजित भूगोल सप्ताह अंतर्गत ‘पर्यावरणीय समस्या व आव्हाने’या विषयावर बोलत होते.
कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.एस.टी. इंगळे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, आज आपल्यासमोर अनेक पर्यावरणीय समस्या आ वासून उभ्या आहेत. मानवाने तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीमुळे वातावरण, मृदावरण,व जलावरण यांत मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत. वातावरण पृथ्वीवरील जीवसृष्टी साठी अत्यंत महत्वाचे आहे. परंतु, गेल्या काही दशकात बेसुमार लोकसंख्यावाढ तसेच औद्योगिक कारखाने व वाहने यातून तयार होणारे घातक रसायने व वायू वातावरणाला प्रदूषणाने भरत आहेत. त्याचा घातक परिणाम म्हणून आज सर्वत्र जागतिक तापमान वाढ, आम्लपर्जन्य, ओझोनथर नष्ट होणे यातून मानवी जीवन संकटात कसे सापडले आहे हे उलगडून दाखवले. तसेच पाण्याच्या समस्ये बद्दल बोलताना ते म्हणाले की, जगातील ७०% लोकांना पिण्यासाठी आजही शुद्ध पाणी मिळत नाही. भारतात निरी या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात भारतातील उपलब्ध पाणीसाठ्यांपैकी ८० टक्के पाणीसाठे प्रदूषित झाल्याने जगातील ही मोठी लोकसंख्या संकटात सापडली आहे.पाण्याचे अयोग्य नियोजन आणि वाढती लोकसंख्या हे अनेक समस्यांचे मुळ आहे. हवा प्रदूषणाचे भीषण स्वरूप आज दिल्ली सारख्या भारतातील प्रमुख शहरात दिसत आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी झाडे लावणे हा महत्वाचा उपाय आहे याकरिता प्रत्येकाने स्वतः पासून सुरवात करणे गरजेचे आहे. या करिता एक विद्यार्थी एक झाड ही संकल्पना विद्यार्थ्यांनी राबवली तर हे चित्र आपण बदलवू शकू. असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच प्रमुख वक्ते यांचा परिचय भूशास्त्र प्रशाला संचालक डॉ. प्रज्ञा प्रविणचंद्र जंगले यांनी केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मू.जे. महाविद्यालयाचे स्वायत्तताप्रमुख डॉ. एस.एन.भारंबे होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.चेतन महाजन,प्रा.सागर डोंगरे, प्रा.भरत महाजन,प्रा. किरण पवार,प्रा. गुलाब तडवी, प्रा. काजल सावकारे, प्रवीण पाटील यांनी परिश्रम घेतले तसेच मोठ्या संख्येने सर्व विद्याशाखांचे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.सहदेव जाधव यांनी केले