मनसेचे पक्षाचा झेंडा बदलणे झाले निश्चित

raj thackeray

मुंबई, वृत्तसंस्था | मनसे अध्यक्ष राज ठाकरे २३ जानेवारी रोजी काय भूमिका घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र ते त्यांच्या पक्षाचा झेंडा बदलणार हे नक्की झालंय कारण त्यांच्या पक्ष चिन्हातून झेंडा काढण्यात आला आहे आणि फक्त रेल्वे इंजिनच ठेवण्यात आले आहे.

 

MNS Adhikrut या ट्विटर हँडलवरुन पक्षचिन्हाच्या मागे असलेला झेंडा हटवण्यात आला आहे. त्या ठिकाणी आता फक्त रेल्वे इंजिनच दिसते आहे. त्यामुळे निळा, भगवा आणि हिरवा असे तीन रंग असलेला मनसेचा झेंडा बदलणार हे निश्चित मानले जात आहे. मात्र त्याचसोबत राज ठाकरे कोणता झेंडा हाती घेणार? हा प्रश्नही उपस्थित होत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांमध्ये दोन बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये काय बोलणे झाले ही माहिती समोर येऊ शकलेली नाही. मात्र भाजपा आणि मनसे यांची युती होऊ शकते, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते.

मनसेने कार्यपद्धतीत काही बदल केले तर युती शक्य आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. मात्र राज ठाकरे यांच्याकडून यासंदर्भात काहीही वक्तव्य अद्याप समोर आलेले नाही. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राजकारणात कुणीही कुणाचा फार काळासाठी शत्रू नसतो, असे सूचक वक्तव्य केले होते. आता मनसेने ट्विटर अकाऊंटवरुन झेंडाही हटवला आहे. त्यामुळे भगवा झेंडा हाती घेऊन राज ठाकरे हिंदुत्त्वाच्या वाटेवर जाणार का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा’ असे मनसेचे पोस्टर १७ जानेवारी रोजी झळकले होते. तसेच १७ जानेवारीच्या सकाळी शिवसेना भवनाच्या समोर राज ठाकरे महाराष्ट्र धर्म सम्राट या आशयाचे पोस्टरही लावण्यात आले होते. या दोन पोस्टर्सची चर्चा पुढचे दोन दिवस चांगलीच रंगली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे, अशी चर्चा रंगली आहे. हा अवकाश भरुन काढण्यासाठी राज ठाकरे पुढाकार घेतील अशी चर्चा आहे. प्रत्यक्षात ते काय भूमिका घेणार ? हे मात्र पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मनसे अधिवेशनासंदर्भातले एक ट्विट MNS Adhikrut वर पोस्ट करण्यात आले आहे. मनसे अधिवेशनाचा नेत्रदीपक सोहळा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सकाळी ९.०० वाजता पार पडणार आहे. असे या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Protected Content