


जळगाव, प्रतिनिधी | शेतकऱ्यांबाबत छत्रपती शिवाजी महाराज यांची जी भूमिका होती तीच भूमिका शरद पवार यांची असल्याने जनतेने त्यांना ‘जाणता राजा’ हि उपाधी दिली आहे असे मत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी व्यक्त केले आहे. ते भगवान गोयल यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन प्रसंगी बोलत होते.
भगवान गोयल लिखित ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची तुलना केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे आज भगवान गोयल यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला असल्याचे गुलाबराव देवकर यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात या घटनेचा सर्वत्र निषेध होत असतांना भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्यांकडून माफी मागण्यात आलेली नाही. नरेंद्र मोदी आपला संदेश ट्वीट करीत असतात परंतु यासंदर्भात त्यांनी कोणतेही ट्वीट केले नसल्याचे देवकर यांनी सांगितले. यावरून त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना हे मान्य आहे का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या जोडो मारो आंदोलन प्रसंगी भारतीय जनता पार्टीचा निषेध असो, भगवान गोयलचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लीलाधर तायडे, पुरषोत्तम चौधरी, योगेश देसले, वाल्मिक पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


