प्रयागराज (वृत्तसेवा) उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं सुरू असलेल्या अर्ध कुंभ मेळ्यात बिहारचे राज्यपाल लालजी टंडन यांचा मुक्काम असलेल्या कॅम्पमध्ये आग लागल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. टंडन हे या दुर्घटनेतून थोडक्यात वाचले असले तरी काही महत्वपूर्ण वस्तू जळून खाक झाल्या असल्याचे वृत्त आहे. दरम्यान,शॉर्टसर्किटमुळं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
प्रयागराजमधील सेक्टर २० जवळच्या त्रिवेणी टेंट सिटीत पहाटे अडीचच्या सुमारास ही आग लागली. राज्यपालांचा मुक्काम असलेल्या कॅम्पमध्येच आग लागल्याने सुरक्षा यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाली. राज्यपाल टंडन हे त्यावेळी झोपेत होते. सुरक्षा रक्षकांनी तातडीने हालचाली करून त्यांना सर्किट हाउसवर हलवले. मात्र, त्यांच्या जवळच्या अनेक वस्तू आगीत खाक झाल्या. कुंभ मेळ्याच्या ठिकाणी लागलेली ही तिसरी मोठी आग आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नाथ संप्रदायाच्या शिबीर परिसरात आग लागली होती. त्यात दोन तंबू जळाले होते. तर, १५ जानेवारी रोजी दिगंबर आखाड्याच्या तंबूत सिलिंडरच्या स्फोटात दहा तंबू जळून खाक झाले होते.