फैजपूर, प्रतिनिधी | येथील सोळा वर्षीय शाळकरी मुलीस एका तरुणाने फुस लावून बळजबरीने पळवून नेल्याची घटना २८ डिसेंबर १९ रोजी सकाळी ७.०० वाजता घडली होती. पोलिसांनी त्या दोघांचा शोध घेवून त्यांना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून ताब्यात घेतले आहे. सद्दाम बाबू तडवी (रा. ईस्लामपुरा, ३ नं. उर्दुशाळेसमोर, ईदगाह, फैजपूर) असे संशयित तरूणाचे नाव आहे.
पीडित मुलगी शाळेत जात असताता सद्दाम याने शहरातून फुस लावून तिला पळवून नेले होते. या प्रकरणी तक्रारीवरून फैजपूर पोलीस स्टेशनला भाग ५ गुरनं ९१/१९ भादंवि कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे, फैजपूर पोलीस स्टेशनचे स.फौ. विजय पाचपोळ, उमेश चौधरी तसेच एलसीबीचे हेड कॉन्स्टेबल विजय देवराम पाटील, नरेंद्र वारूळे यांचे पथक त्यांच्या शोधासाठी तयार केले होते. ते दोघे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स.फौ. विजय पाचपोळ तसेच उमेश चौधरी यांनी जत परिसरातून अल्पवयीन मुलगी व संशयित सद्दाम तडवी यांना शोधून ताब्यात घेतले आहे.