जळगाव प्रतिनिधी । ओजस आयुर्वेद आणि शारदा कॉमर्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी योग प्रकल्प घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर ओजस आयुर्वेदचे संचालक डॉ. महेश बिर्ला, शारदा कॉमर्स अकादमीचे संचालक प्रा.कैलास न्याती, डॉ. अरुण गोपीनाथ आणि योग तज्ज्ञ प्रा.कृणाल महाजन उपस्थित होते.
धन्वंतरी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रा. न्याती सरांनी योग प्रकल्पाचे महत्व सांगितले तर डॉ. महेश बिर्ला यांनी विद्यार्थ्यांचे स्वास्थ यावर मार्गदर्शन केले. डॉ. अरुण गोपीनाथ यांनी आयुर्वेद आणि योग याचे महत्व पटवून दिले. प्रा. कृणाल महाजन यांनी योग प्रोटोकॉल तयार करून विद्यार्थ्याकडून एकाग्रता, स्मरणशक्ती आणि तणाव मुक्त जीवनासाठी आवश्यक असलेल्या योगिक क्रियांचा सराव करून घेतला.
विद्यार्थी जीवनात येणारे ताण – तणाव, स्पर्धात्मक युगात स्वतःला सिद्ध करण्याची चढाओढ आणि त्यात आलेले अपयश सहन न करण्याची वृत्ती यामुळे विद्यार्थी मानसिक दृष्ट्या खचत आहे. यातून अनेक मानसिक तसेच शारीरिक विकार विद्यार्थ्यांना जडत आहेत. आजचा विद्यार्थी हा भारताचा भविष्य आहे मात्र दैनंदिन जीवनात अनेक व्याधी आणि तणावाने ग्रसित होत आहेत. यावर उपाय म्हणून ओजस आयुर्वेद आणि शारदा कॉमर्स अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी एक तासाचा ‘तणावमुक्त योग प्रकल्प’ घेण्यात आला.
यावेळी कार्यक्रमात योगिक खेळ घेण्यात आले ज्यात मुलांच्या संघात अजय कापसे तर मुलींच्या संघात संध्या पाटील विजयी ठरले. कार्यक्रम प्रसंगी डॉ.रेणुका राजे यांनी सूत्रसंचालन केले तर खुशी मंडोरा यांनी व्यासपीठावरून योगिक क्रियांचे प्रात्याक्षिक दाखविले. ओजस आयुर्वेदच्या संचालिका अर्चना बिर्ला, आदर्श के., राकेश मेटकर, डॉ. कृष्णप्रिया आदींचे सहकार्य सदर प्रकल्पाला लाभले.