लखनऊ (वृत्तसंस्था) काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांच्या मिशन यूपीला आजपासून लखनऊनमधून सुरुवात होणार आहे. त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भव्य ‘रोड शो’ ने काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांच्या ‘मिशन यूपी’ मोहिमेला लखनऊमध्ये सुरुवात झाली आहे. प्रियंका यांच्या आगमनाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंधिया प्रियंका यांच्यासोबत आहेत. लखनऊ विमानतळ ते काँग्रेस कार्यालय असा १५ किलोमीटर मार्गावर हा रोड शो होत आहे. प्रियंका गांधी यांचा एक ऑडिओ संदेश समोर आला आहे. त्यामध्ये त्यांनी युवक, महिला आणि समाजाच्या दुर्बल वर्गाला नवे भविष्य घडवण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आपण सर्व मिळून राजकारणात नवी सुरुवात करु असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. लखनऊमध्ये काही पोस्टर्सवर प्रियंका गांधी यांना देवीच्या रुपात दाखवण्यात आले आहे तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचा फोटो असलेले टी-शर्ट कार्यकर्त्यांनी परिधान केले आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाचा परिणाम लोकसभा निवडणुकांवर निश्चितपणे होईल, तसेच राहुल-प्रियंका ही भाऊ-बहीण जोडी काँग्रेससाठी बदलाची शिल्पकार ठरेल, असा विश्वास इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केला आहे. राजीव गांधी यांच्या काळात भारतात दूरसंचार क्रांती आणण्याचे श्रेय पित्रोदा यांना जाते. त्यांनी ज्ञान आयोग व राष्ट्रीय नवप्रवर्तन मंडळाची स्थापना यूपीए सरकारच्या काळात केली होती. पित्रोदा म्हणाले की, राहुल व प्रियंका यांच्या जोडीला सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे, मिलिंद देवरा यांची साथ आहे, त्यामुळे ही तरुणांची फळी केवळ इतिहास व धर्मात न अडकून पडता चांगले काम करील.