मुंबई, वृत्तसंस्था | मागील महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रीपद भूषवलेल्या काही ज्येष्ठ शिवसेना नेत्यांना महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला आहे. शिवसेनेनेकडून यंदा विधान परिषदऐवजी विधान सभेतील आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यावर भर देण्यात आला आहे.
शिवसेनेने मागील मंत्रिमंडळातील दीपक केसरकर, रविंद्र वायकर, तानाजी सावंत, दिवाकर रावते, रामदास कदम यांना वगळले आहे. मागील सरकारमधील विजय शिवतरे, जयदत्त क्षीरसागर यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. या मंत्रिमंडळ विस्तारात विधान परिषदेतून शिवसेनेने अॅड. अनिल परब यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. तर, सुभाष देसाई यांना महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. त्यामुळे आता विधान परिषदेतील दोन आमदारांचा समावेश शिवसेनेने मंत्रिमंडळात केला आहे.
शिवसेनेने मागील महायुती सरकारमध्ये असलेले एकनाथ शिंदे, उदय सामंत, सुभाष देसाई, संजय राठोड या मंत्र्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. मागील महायुती सरकारच्या काळात शिवसेनेकडून विधान परिषद सदस्य असलेले दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळात समावेश होता. त्यांना यंदा मात्र वगळण्यात आले आहे.
महायुतीच्या सरकारमध्ये विधान परिषद सदस्यांना मंत्रिमंडळात झुकते माप दिल्यामुळे शिवसेनेच्या विधानसभा आमदारांमध्ये नाराजी होती. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांची समजूत काढत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेकडून विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.