आदित्य ठाकरेंना मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी

0Aaditya Thackeray 11

मुंबई, वृत्तसंस्था | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळ विस्तारात आमदार आदित्य ठाकरे यांचाही समावेश होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. राजभवनाकडून आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. यात आदित्य ठाकरे यांच्या नावाचा समावेश असून, त्यांच्यावर कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरेंकडे कोणत्या खात्याची जबाबदारी देणार याकडे सगळ्यांची नजर लागली आहे.

 

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे कुटुंबातील सदस्याने प्रथमच सक्रिय राजकारणात प्रवेश केला. आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयीही झाले. विशेषतः शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांचाही मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी चर्चा होती. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.

आमदार अन कॅबिनेट मंत्री
आदित्य ठाकरे पहिल्यांदाच आमदार झाले आहे. आमदार झाल्यानंतर थेट मंत्रिमंडळात आणि थेट कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळण्याची ही दुर्मिळ राजकीय घटना आहे. आदित्य ठाकरे हे राजकारणात नवखे असून त्यांना मंत्रिमंडळात स्थान देणार की नाही ? याविषयी साशंकता होती. पण, ती खोटी ठरली आहे. आता आदित्य ठाकरे यांच्याकडे कोणते खाते दिले जाईल, याची चर्चा सुरू आहे. आदित्य यांना शहरांचा विकास आणि पर्यावरणाविषयी जवळीक आहे. त्यामुळे या दोन्ही खात्यापैकी त्यांच्याकडे एक खाते दिले जाऊ शकते. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आदित्य यांनी अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले. त्यांच्याकडे नव्या कल्पना आहे. त्यामुळे या खात्यासाठी त्यांचा विचार केला जाऊ शकतो.

Protected Content