जळगाव प्रतिनिधी । शहरातील प्रसिध्द रुग्णालयात काम करत असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी परिचारिकेचा रुग्णालयातच काम करणार्या तिघा तरुणांनी छळ करत तिचा विनयभंग केल्याची घटना रविवारी समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, नंदूरबार जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेली तरुणी शहरातील प्रसिध्द असलेल्या बालकांच्या खाजगी रुग्णालयात तीन ते चार वर्षापासून काम करते. रुग्णालयात उपलब्ध करण्यात आलेल्या हॉस्टेलमध्ये इतर पारिचारिकांसोबत राहते. 28 रोजी तरुणी रुग्णालयात कामावर येत असताना तिला तिच्या सोबत काम करणार्या दुसर्या परिचारिकेने रुग्णालयात काम करणार्या गौरव सुरडकर नामक तरुणाने नावाचा व्हिडीओ स्टेटस् ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार तरुणीने व्हिडीओ बघितला. यात तिच्या नावाचा उल्लेख असल्याचे लक्षात आले. या व्हिडीओमध्ये रुग्णालयात काम करणार्या आमिर तडवी व प्रदीप पाटील हे दोघेही गौरव सोबत दिसत होते. याबाबत तरुणीने रुग्णालयात मॅनेजर प्रविण ठाकूर यांना व्हिडीओ दाखवून तक्रार केली. त्यांनी हॉस्पिटलचे इंचार्ज डॉ. अविनाश भोसले यांच्याशी चर्चा करुन असे सांगितले. यानंतर रविवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास ठाकूर यांनी तरुणीला फोन करुन वरिष्ठांशी चर्चा झाली असून तिन्ही तरुणांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेवू असे सांगितले.
तिघांकडून तरुणीचा पाठलाग
तिघा तरुणांपैकी दोघे वार्डबॉय तर एक रिसेप्शनिष्ट आहे. त्यांना रुग्णालयाच्या कामादरम्यान साहित्य मागितले असता, आमीर तडवी याने मनास लज्जा उत्पन्न होईल भाषा वापरली. तक्रार केली म्हणून तिघांनी तरुणीला त्रास दिला तसेच तिच्या नावाचे व्हिडीओ बनवून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने तरुणीची बदनामी झाली. एवढेच नाहीतर तिघांनी तक्रार केल्याच्या रागातून तरुणीचा पाठलाग सुरु केला. जाब विचारला असता तुला बघून घेवू अशी धमकी देत असल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीनुसार गौरव सुरडकर, आमिर तडवी, प्रदीप पाटील या तिघांविरोधात जिल्हापेठ पोलिसात विनयभंग तसेच आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.